21 हजार 604 जागा, फक्त 207 अर्ज दाखल
| रायगड | खास प्रतिनिधी |
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यात दोन हजार 910 शाळा आहेत. त्यामध्ये 21 हजार 604 जागा आरटीईनुसार आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारपर्यंत फक्त 207 अर्ज दाखल झाले होते. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून प्रवेश अर्ज भरण्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अर्ज भरले गेले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 76 हजार 36 शाळांमधील आठ लाख 86 हजार 159 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. रायगड जिल्ह्यात दोन हजार 910 शाळा आहेत. त्यामध्ये 21 हजार 604 जागा आरटीईनुसार आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, शुक्रवारपर्यंत फक्त 207 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात, याबाबतचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मंगळवारपासून (ता.16) अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, 30 एप्रिल अंतिम मुदत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया रखडली होती. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल या प्रतिक्षेत विद्यार्थी आणि पालक असताना आता ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. समाजातील आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, अंतर्गत प्रवेश प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. बुधवारपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे.
पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे. त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे. सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा मग आरटीईचा अर्ज कशाला करायचा? अर्ज न भरतासुद्धा शाळेत थेट प्रवेश मिळतोच ना? मग एवढा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आपल्या मुलालासुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पालक आरटीईतून प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदापासून काही बदल
आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदापासून काही बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरादरम्यान अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
अशी करा नोंदणी
आरटीई अंतर्गत पाल्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारा नोंदणी झाल्यानंतर, आरटीईचा लाभ घेता येईल. नोंदणीसाठीचे नियम, आवश्यक कागदपत्रे आदींबाबत https://student.maharashtra.gov.in/adm_portal _या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.