तापमान पारा 16 वर
। मुरूड-जंजिरा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यात थंडीची तीव्रता वाढल्याने गुरुवारी (दि.25) सकाळी पहाटे मुरूड तालुक्याचे तापमान 16 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. तीन दिवसांपुर्वी तापमान 23 अंश सेल्सियस होते. अचानक गारठा वाढल्याने तापमान 7 अंश सेल्सियस इतके खाली घसरले असून नागरिक व पर्यटकांना हुडहुडी भरलेली दिसून येत आहे. या पासून बचाव करण्यासाठी अनेकजण जागोजागी शेकोट्या, स्वेटर्स, मफलर्स, गरम कपडे घालून बाहेर पडताना दिसत आहेत. वातावरणात गारठा वाढल्याने नागरिकांना खोकला, सर्दी, ताप मोठा त्रास होत असून दवाखान्यात रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. समुद्र किनार्यावर थंड वारे वाहत आहेत. त्यातच प्रजासत्ताक दिनापासून तीन दिवस सलग सुट्टी असल्याने राज्यातील अनेक ठिकाणचे पर्यटक मुरूड, नांदगाव, काशीद बीच, जंजिरा किल्ला, पद्मजलदुर्ग आणि येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने डेरेदाखल होत आहेत. पर्यटकांना देखील बोचर्या थंडीचा सामना करावा लागणार. तरी पर्यटनाचा आनंद थंडीत आधिक घेता येतो अशा प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी मुरूड समुद्रकिनारी प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केल्या.