जलजीवन मिशनच्या कामांवर जिल्हधिकारी नाराज

कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश
| रायगड | खास प्रतिनिधी |
जलजीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत फक्त 25 टक्केच कामे पूर्ण झाल्याने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी एका बैठकीत नाराजी व्यक्त केली. मागे पडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, यासाठी संबंधित विभागाने आणि नियुक्त सल्लागार संस्थेने प्राधान्याने त्रुटी दूर कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत 1288 कोटी रुपये खर्च आराखडा असून 1422 कामे मंजूर आहेत. त्यापैकी 381 कामांची प्रगती 0 ते 25 टक्के दिसून आली. डिसेंबर अखेर यातील सर्व काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याने कामांच्या प्रगतीमुळे सदर महत्त्वपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. यात अजिबात सुरू न झालेल्या कामांमध्ये तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले.

संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी नियम व कार्यादेशातील तरतुदीच्या आधारे जलजीवन मिशनमधील कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. कामे निर्धारित कालावधीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या. पनवेल, महाड व कर्जत या तालुक्यातील कामांची प्रगती कमी आहे असे आढळून आले.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतीच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी , उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाबार्ड व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत विविध विषयाबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री यांच्या वतीने प्राधान्याने लक्ष देण्यात येत असलेल्या ङ्गङ्घजल जीवन मिशनङ्घङ्घ व ङ्गङ्घहर घर नलङ्घङ्घ या प्रमुख योजनांबाबत तपशीलवार आढावा घेण्यात आला. ङ्गङ्घहर घर नलङ्घङ्घ मधील एकूण 1831 पैकी 926 कामे पूर्ण असून 457 गावातील नळजोडणी पूर्ण होणे बाकी आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावात प्रत्येक घरात शंभर टक्के नळ जोडणी करणे अपेक्षित असल्याचे म्हसे यांनी सांगितले.

Exit mobile version