महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ येथील मातोश्री टिपणीस महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनामधील विद्यार्थ्यांचे सातदिवसीय श्रम संस्कार शिबीर आनंदवाडी येथे आयोजित केले होते. या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रम राबवून परिसरातील जनतेकडून प्रेम मिळविले. या सात दिवसीय श्रम संस्कार निवासी शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनामधील 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विशेष श्रमदान शिबिराचे उदघाटन विदया मंदिर मंडळाचे विश्वस्त डॉ. मिलिंद पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विदया मंदिर मंडळाचे विवेक पोतदार, प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे उपस्थिती होते. यावेळी स्वामीधाम वृद्धआश्रमातील परिसराची स्वच्छता, आनंदवाडी येथील लोकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन मातीचा बंधारा बांधणे, आनंदवाडी येथील शाळेची स्वच्छता, ग्रामस्थांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन, गाव स्वच्छता, रोगाराई, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण, ओला कचरा सुखा कचरा याविषयी जनजागृती करण्यात आली. सातव्या दिवशी श्रम संस्कार शिबीराचे समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद वाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत विविध मैदानी खेळ खेळण्यात आले.

Exit mobile version