जे. एस. एम. महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षल जुईकर यास संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

अलिबाग | भारत रांजणकर |

जे. एस. एम. महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षल जुईकर यास संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, सेक्रेटरी अजित शाह यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षल याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

पंतप्रधान कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या विशेष शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी केवळ दोन विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्यात हर्षल जुईकर या अलिबागमधील जे.एस.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यापूर्वी दिनांक १५ ते २० नोव्हेंबर २०२१ दरम्यान पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरामध्ये हर्षल सहभागी होणार आहे.

या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी हर्षल याने महाविद्यालयांमधील विविध स्पर्धांमधील सहभागातून बौद्धिक गुणांमध्ये केलेली प्रगती, आविष्कार संशोधन स्पर्धांमधील संशोधन प्रकल्पातून झालेला बौद्धिक विकास, भारतातील रेल्वेमधील मानवरहित मोटरमन यावर केलेले संशोधन, गुगलद्वारे दिली गेलेली फेलोशिप आणि त्याच्यावरील शिक्षणाचा खर्च अशा अनेक कामगिरीचे कौतुक करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हर्षलचे कार्य गौरवास्पद आणि प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त करून त्याच्या विषय शिक्षकांचाही यामध्ये मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार काढले आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जनता शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्याकडून दिल्या गेलेल्या शुभेच्छा आणि महाविद्यालयाकडून झालेल्या कौतुकाबद्दल मनोगत व्यक्त करताना हर्षल याने महाविद्यालयातील प्राचार्य, विषय शिक्षक, आविष्कार संशोधन कार्यशाळेमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन देणारे प्राध्यापक यांचे ऋण व्यक्त केले. आपल्या मनोगतामध्ये हर्षलने देशात स्वनिर्मित क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. जगामध्ये जे तंत्रज्ञान केवळ गुगल आणि नासा या संशोधन संस्थांकडे उपलब्ध आहे ते तंत्रज्ञान भारतात निर्माण झाल्यास देशातील घड्याळाच्या काट्याप्रमाणे देशाची सुरक्षा करणाऱ्या डी.आर.डी.ओ., इस्रो, मिलिटरी गुप्तवार्ता आणि इतर संशोधन संस्थांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्याने अशा संस्थांची तंत्रज्ञान शक्ती अनेक पटीने वाढेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. बी आचार्य, प्रमुख- सांस्कृतिक कार्यक्रम विभाग यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version