जवळपास 40 ते 50 प्रवासी जखमी
। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड परिसरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन्ही बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून जवळपास 40 ते 50 प्रवासी जखमी झाले आहेत.
हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वरवंड गावाजवळील कौठीचा मळा येथे घडला. सोमवारी (दि. 28) सायंकाळी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससमोर एक दुचाकी आडवी आली. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. या अपघातात एक महिला व एक ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून सुवर्णा संतोष होले (38) व नामदेव आढाव (70) अशी मृतांची नावे आहेत. तर, या अपघातात दोन्ही बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले आहेत.