। अहिल्यानगर । प्रतिनिधी ।
राशीन-भिगवण राज्यमार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यात रवाना करण्यात आले आहे.
हा भीषण अपघात राशीन-भिगवण राज्यमार्गावर खेड नजीकच्या आखोणी शिवारात बुधवारी (दि.27) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला. कृष्णा चौधरी (23), शुभम पांढरे, अविनाश निकम हे तिघे भिगवणकडून राशीनकडे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी सुहास राजेंद्र सस्ते (24) हे राशीनहून खेडच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, आखोणीच्या पुलावरून पुढे जाताना वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, या अपघातात सुहास सस्ते व कृष्णा चौधरी या दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. तर, शुभम पांढरे व अविनाश निकम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राशीन येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात रवाना करण्यात आले.