| न्युयॉर्क | वार्ताहर |
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीत कोलंबिया संघाने उरुग्वेचा 1-0 असा पराभव करत तब्बल 23 वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 39व्या मिनिटाला जेफेर्सन लेर्माने केलेला गोल निर्णायक ठरला असून अंतिम सामन्यात कोलंबियाचा सामना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाशी होणार आहे.
सामन्यातील बहुतांश वेळ उरुग्वेकडे बॉल होता. मात्र, त्यांना बरोबरी साधता आली नाही. आता अंतिम फेरीत कोलंबियाचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. जो रविवारी रात्री फ्लोरिडाच्या मियामी गार्डन्सवर खेळला जाईल. स्पर्धेत कोलंबियाचा ‘ड’ गटामध्ये समावेश होता. कोलंबियाने या गटामधून सात गुणांसह पहिले स्थान पटकावत आगेकूच केली. कोलंबियाने शेवटची कोपा अमेरिका स्पर्धा 2001 मध्ये जिंकली होती. 2021मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांची नजर अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा पराभव करत चषक जिंकण्यावर असणार आहे.
बॅड बॉय सुआरेझ
2014 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत इटालियन डिफेन्डर जॉर्जिओ चिएलिनी याचा चावा घेल्यानंतर लुईस सुआरेझवर 4 महिन्यांची बंदी घातली गेली होती. 2014च्या घटनेपूर्वी 2010 व 2013 मध्ये सुआरेझकडून खेळाडूंच्या चावा घेलल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर सुआरेझ सुधरला आहे असे वाटत असताना गुरूवारी पहाटे झालेल्या सामन्यादरम्यान पुन्हा सुआरेझने कोलंबियन खेळाडूचा चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.