अध्यक्ष लीना गरड यांची भूमिका
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
दुहेरी मालमत्ता कराविरोधात आक्रमक भूमिका घेणार्या कॉलनी फोरमकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीकडून मालमत्ता कर कमी करण्यासंदर्भात आश्वासन दिले गेल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कॉलनी फोरम पाठिंबा देणार असल्याचे सांगत आश्वासन न मिळाल्यास कॉलनी फोरम लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती फोरमच्या अध्यक्ष लीना गरड यांनी समाज माध्यमावर दिली आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) गटाचे मावळ लोकसभा मतदार संघांचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोसायटी कॉलनी फोरमकडे आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्या पार्शवभूमीवर कॉलनी फोरमच्या अध्यक्ष लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली फोरमच्या सदस्यांनी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन पनवेल पालिका हद्दीत लागू करण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराविरोधातील आपल्या भूमिकेची माहिती देत मालमत्ता कराविरोधात कॉलनी फोरमची असलेली भूमिका समजावून सांगितली होती. कॉलनी फोरमच्या मालमत्ता कराविरोधात असलेल्या भूमिकेला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून मालमत्ता कराचा प्रश्न सोडविण्याबाबत ठोस आणि स्पष्ट भूमिका घेण्यात येत असेल, तसे वचन देण्यात येत असेल, तर कॉलनी फोरमने उमेदवाराला पाठिंबा देणे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटात सामील होणे, असा निर्णय घेणार असल्याचे मत फोरमच्या अध्यक्ष गरड यांनी व्यक्त केले आहे. तसेच मालमत्ता कराचा प्रश्न सोडवण्याची स्पष्ट आणि ठोस भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून घेण्यात आली नाही, तर कोणत्याही पक्षात प्रवेश न करता कॉलनी फोरम 2 लाख 80 हजार मालमत्ताधारकांसाठी येणारी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती गरड यांनी समाज माध्यमातून मतदारांना दिली आहे.
फोरमच्या निर्णयाचा फटका कोणाला? कॉलनी फोरमने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेच्या मालमत्ता कराविरोधात नाराज असलेल्या पालिका हद्दीतील मतदाराणी कॉलनी फोरमच्या भूमिकेला पाठिंबा देत मतदान केल्यास महायुतीच्या उमेदवाराविरोधातील मतदानात विभाजन होऊन याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.






