छोटे मच्छिमार सुखावले
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मासळीच्या दुष्काळामुळे मुरूड तालुक्यातील 70 ते 80 टक्के दालदी मोठ्या मासेमारी नौका महिनाभर आधीच किनार्यावर ओढण्यात आल्याने पापलेट, सुरमई, रावस आदी प्रकारातील मासळी अगदी अभावानेच मार्केटमध्ये दिसून येते. परंतु, अचानक शनिवारपासून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील छोट्या मच्छिमारांना कोलंबी मिळू लागल्याने आर्थिक समस्येने पोळलेले मच्छिमार सुखावले आहेत.
12 वाव समुद्राच्या आत पद्मजलदुर्गच्या आसपास दोन सिलिंडर छोट्या नौकांची कोलंबीसाठीची मासेमारी शेवटच्या सिझनमध्ये सुरू असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत बोलताना मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर म्हणाले की, गेली चार वर्षे मासळीचा काही ना काही कारणाने दुष्काळ पडत असून, मच्छिमार बांधवांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अचानक येणारी वादळे, अवकाळी पाऊस, स्पीड मासेमारी, मानवी प्रदूषण यामुळे पारंपरिक मासेमारीवर मोठा परिणाम झाला असून, मोठी मासळी मिळण्याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून मासेमारी करणे अत्यंत अवघड आणि नुकसानीचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या नौका नाईलाजाने 1 जूनपूर्वीच किनार्यावर ओढव्या लागल्या आहेत. कोलंबी, जवळा, खेकडे, खडक पालू अशी मासळी मार्केटमध्ये दिसून येते. याचा परिणाम पर्यटनावर झाला असून, ताजी मासळी खाण्यासाठी मुरूडमध्ये येणार्या पर्यटकांचा सुट्टीच्या दिवसात हिरमोड झाल्याचे दिसून येते.
पावसाळ्यात 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद राहणार आहे. मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात छोट्या मच्छिमारांना लाल कोलंबी मिळू लागल्याने खूप हायसे वाटू लागल्याचे मच्छिमारांनी सांगितले. जेलिफिश मिळणे बंद झाल्याने आणि किमान कोलंबी मिळत असल्याने मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले. राजपुरी येथील मच्छिमारांना किमान जवळा मिळत असल्याने मार्केटमध्ये जवळा उपलब्ध होताना दिसत आहे. पावसाळी मासेमारी बंद होण्यासाठी 20 दिवस उरले असून, मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी छोट्या मच्छिमारांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक बाजूने मच्छिमार पोळला असून, शासनाकडून मच्छिमारांना कोणतेही विशेष पॅकेज नसल्याची खंत रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले आणि मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी व्यक्त दिली.