शेकाप मध्यवर्ती समितीची आज बैठक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची आखणी करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी सांगोला येथे आयोजन करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती बैठकीला रायगड जिल्ह्यातून पक्षाचे सुमारे 500 प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी दिली. शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सांगोला, जि. सोलापूर याठिकाणी शनिवार, दि.25 आणि रविवार, दि. 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे राजकारण घडवण्यासाठी पक्षबांधणी ही आवश्यक बाब असून, जिल्हा-तालुका-गाव पातळीवर पक्षाचे संघटन उभारणे गरजेचे आहे. युवा, विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार या प्रमुख जनआघाड्यांसह इतरही आवश्यक जनआघाड्या स्थापन करून त्या क्रियाशील करणे, ही काळाची गरज आहे. पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन करणे, तसेच तातडीने करावयाच्या आंदोलनाची आखणी करणे, हे या बैठकीसमोरील मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणूनच सांगोला येथे होणार्या मध्यवर्ती समिती बैठकीचा प्रमुख मुद्दा पक्षबांधणी राहणार आहे. गावपातळीपासून पक्षसंघटना बांधणी हे आपले उद्दिष्ट असून, प्रथमतः महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची जिल्हा समिती गठीत करून कार्यरत करणे, हे पहिले काम आहे. आजमितीस ज्या जिल्ह्यात जिल्हा समिती कार्यरत आहे, त्याठिकाणी तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करणे आवश्यक असून, प्रत्येक जिल्हा चिटणीसांनी बैठकीला येतेसमयी आपापल्या जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा विस्तृत अहवाल सोबत घेऊन यावे, अशी सूचना आहे. नवीन ठिकाणी पक्षबांधणीबाबतीत काही प्रस्ताव व सूचना असल्यास चर्चेत तशी मांडणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. या बैठकीत जनआघाड्यांचे बाबतीत चर्चा होऊन, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. मध्यवर्ती समितीचे बैठकीचे ठिकाण हर्षदा लॉन्स, मिरज रोड, सांगोला, जिल्हा-सोलापूर असे आहे. यासंदर्भात काही अडचण वा विचारणा करणे आवश्यक असल्यास मध्यवर्ती समिती बैठकीचे प्रमुख व्यवस्थापक दत्तात्रय वाघमारे यांच्याशी त्यांच्या मो. नं. 9764351761 वर संपर्क साधावा. तसेच काही विशेष अडचणीकरिता आवश्यक असल्यास बाबासाहेब कारंडे, 8888666464, बाळासाहेब काटकर 9011145555, दादासाहेब बाबर 9975994243, गजेंद्र कोळेकर 9764920981, नानासाहेब लिगाडे 7218180001 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे यांनी केले आहे.





