भारतीय नौदलाचे सरखेल हे मानबिंदू – कमांडर आदित्य हाडा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सरखेल आंग्रे यांना भारतीय नौदल आपला मानबिंदू मानते आणि त्यांच्या नीती धोरणांचे आधुनिक नौदल आजदेखील अनुसरण करते,असे प्रशंसोद्गार कमोडोर आदित्य हाडा यांनी विशेषत्वाने नमूद केले.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या 293 व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी ( 4 जुलै) भारतीय नौदलाचे पश्‍चिमी क्षेत्र मुख्यालय भारतीय नौसेना पोत आंग्रे या नौदल तळाचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर आदित्य हाडा यांनी भारतीय नौदलाच्या वतीने पुष्पचक्र तर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रघुजीराजे आंग्रे सरखेल, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांच्यासह विविध मान्यवरांनी मराठा आरमाराच्या सरखेलांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

दरवर्षी 4 जुलै रोजी या महान सागरवीराला अलिबाग नगरपरिषदेद्वारे अभिवादन केले जाते. या वर्षी गाज या सरखेल रघुजीराजे आंग्रे यांच्या उपक्रमांतर्गत भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करून नौदल तथा महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात संवाद प्रस्थापित करण्याकरिता जेएसएम महाविद्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत कमोडोर आदित्य हाडा यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे कार्य, तत्कालीन परिस्थितीत मराठा नौदलाची आवश्यकता, आजच्या आधुनिक काळात कान्होजींच्या विचारांची प्रासंगिकता आणि आजच्या तरुणांसाठी आधुनिक नौदलातील भविष्यकालीन संधी याबाबत कमोडोर हाडा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच भारतीय नौसेना भविष्यात अलिबाग आणि परिसरातील अनेक लोकोपयोगी प्रकल्पात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, रघुजीराजे आंग्रे सरखेल, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ड.मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी अंगाई साळुंके, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ड.गौतम पाटील, जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रदीप नाईक, मंगेश दळवी, नगरपालिका शाळांचे शिक्षक-विद्यार्थी व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांनी केले. सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी गाज च्या माध्यमातून भारतीय नौसेना आणि नागरिकांच्या सहयोगाने कोकण किनारपट्टीवर अनेक लोकोपयोगी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकस्बाफ या हेरिटेज मॅनेजमेंट कंपनीचे संचालक सचिन सावंत यांनी केले.

Exit mobile version