आठ महिन्यानंतर काँक्रीटीकरणाला सुरुवात
| तळा | वार्ताहर |
तळा बसस्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवारपासून बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या तळा बसस्थानकाच्या कामामुळे येथील नागरिकांसह प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.
तळा बसस्थानकाची झालेली दुरवस्था, मुतारी तुंबल्यामुळे सर्वत्र पसरलेली दुर्गंधी तसेच खडकाळ व ओबडधोबड जागेमुळे बस लावताना चालकाला येणाऱ्या अडचणी याबाबत अनेकदा विविध वृत्तपत्रातून बातम्या झळकल्या होत्या. अखेर या कामाला मंजुरी मिळाल्याने 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी सदर कामाला सुरुवात झाली नसल्याने या बसस्थानकाचे काम होणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. अखेर सोमवारी तळा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळाला आणि प्रत्यक्षात बसस्थानकाच्या कामाला सुरुवात झाली.
सुरुवातीस बसस्थानकाचे काँक्रीटीकरण त्यानंतर संरक्षक भिंत व त्यानंतर शौचालय अशा प्रकारे काम करण्यात येणार आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तळा बसस्थानकाचे काम सुरू झाल्याने शहरवासीयांसह तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.