ताकई-महड रस्त्याच्या प्रलंबित कामास सुरूवात

खोपोली-खालापूर संघर्ष समितीच्या पाठपुराव्यास यश

। खोपोली । वार्ताहर ।

ताकई-महड रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी सुरू झाली असून लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण सुरू होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता, पेणचे रवींद्र कदम व वन विभागाचे अधिकारी यांनी तांत्रिक प्रश्‍नाची उकल करून मार्ग काढल्याबद्दल समितीच्यावतीने त्यांचे आभार मानले आहेत.

खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा धाकटी पंढरी येथील साजगाव फाटा येथून प्रसिद्ध अष्टविनायक महड देवस्थानकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा रस्ता ताकई येथील स्मशानभूमीकडे जातो. या रस्त्याचा काही भाग हा वन खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने रस्ता पूर्णत्वास जात नव्हता. या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडून या ठिकाणी अपघाताला व आजारपणाला आमंत्रण मिळत होते. या रस्त्याच्या कामासाठी संबंधित यंत्रणांच्या परवानगी घेण्यासाठी खोपोली-खालापूर संघर्ष समितीने जोरदार पाठपुरावा करून हा रस्ता सुरळीत करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. संयमाचा बांध फुटेपर्यंत प्रशासन काम करीत असेल तर शांततेच्या मार्गाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लवकरच बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला.

खोपोली खालापूर संघर्ष समितीच्यावतीने पाठपुराव्यासाठी डॉ.शेखर जांभळे, मोहन केदार, आशपाक लोगडे, उबेद पटेल, नरेंद्र हर्डीकर, मनोहर ठोंबरे यांनी अथक प्रयत्न केले. याकामी अ‍ॅड.मीना बाम, अ‍ॅड.शैलेश पालांडे, अ‍ॅड.जयेश तावडे यांचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे.

Exit mobile version