। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायतीमधून मोठ्या समजल्या जाणार्या नेरळ ग्रामपंचायतीमधील महसूल वाढीचे उद्दिष्ट राहिले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीकडून घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. नेरळ ग्रामपंचायतीमधील पाणीपट्टी आकारणी हि आजुबाजुंच्या ग्रामपंचायती पेक्षा निम्मी असून भविष्यात पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेरळ, आनंदवाडी, जुम्मापट्टी अशी तीन महसुली गावे नेरळ ग्रामपंचायतीत असून सहा आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. तसेच, येथील लोकसंख्या आता 30 हजार पार गेली आहे. मात्र, तरीदेखील नेरळ ग्रामपंचायतीतील आर्थिक उत्पन्नांचे गणित जुळत नसल्याने रायगड जिल्हा परिषद असमाधानी आहे. नेरळ गावात साधारण 14 हजार मालमत्ता असून त्यांच्याकडून साधारण अडीच कोटींचा महसूल वर्षाला जमा झाला पाहिजे. मात्र, काही ठराविक मालमत्ताधारक हे अनेक वर्षे मालमत्ता कर भरत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीतून महसूल संकलन हे 75 ते 80 टक्के यापुढे कधीही गेले नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीतील घरपट्टी सतत थकीत ठेवणार्या 2 हजार मालमत्ताधारकांना ग्रामपंचायतीकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.
पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता
नेरळ ग्रामपंचायतीतील पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता असून रायगड जिल्हा परिषदेकडून तसे विचार सुरु आहेत. सध्या ग्रामपंचायतीत प्रशासकीय राजवट असल्याने राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून घरपट्टीबद्दल आढावा घेतला जात आहे. नेरळमध्ये 5 हजार 500 पाणीपट्टी ग्राहक असून 100 ते 200च्या आसपास पाणीपट्टी एका कुटुंबाला आकारली जाते. त्यात नेरळ ग्रामपंचायतीतील पाणी हे जलशुद्धीकरण प्रकल्पामधून शुद्ध करून वितरित केले जाते. असे असताना देखील येथील पाणीपट्टी कमी आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ केल्यास पंचायतीतील महसुल वाढ होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.