झिराड जि.प.शाळेत उन्हाळी शिबिराचा प्रारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
झिराड येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शिबीराचे आयोजन मुंबई येथील द. लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्यावेळी झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, माजी सरपंच महेश माने, शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल थळे, शिक्षक कृष्णकुमार शेळके, उमेश ठाकूर, ज्योती गायकवाड, द लाईफ फाऊंडेशनचे रायगड जिल्ह्यातील प्रकल्प समन्वय व त्यांचे सहकारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
16 ते 20 मे या कालावधीत घेण्यात येणार्‍या उन्हाळी शिबीरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मुल्य, ध्यान, वेगवेगळे खेळाचे प्रकार, आरोग्य विषयक अशा अनेक प्रकारची माहिती खेळता खेळता दिली जाणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. विद्यार्थ्यांना या उन्हाळी शिबीराद्वारे घडवून त्यांची बौध्दीक व शारिरीक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रफितीद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविली जाणार आहे. वेगवेगळ्या खेळामार्फत त्यांना शिकवून त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे. चित्रकला, टाकावू पासून टीकावू तयार करणे अशा अनेक प्रकारचे ज्ञान देऊन त्यांना स्वावलंनी बनविण्याचा एक प्रयत्न केला जाणार आहे. पाच दिवस असलेल्या या शिबीरातून जिल्हा परिषद शाळेतील गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्य दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असणार आहे.

Exit mobile version