विद्यार्थ्यांच्या उभारीसाठी चावडी वाचन; कृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची प्रगती
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शिक्षण विभागाने कृती कार्यक्रम आयोजित केला आहे. अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांना शोधून गावांमध्ये चावडी वाचन केले जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे अध्ययनात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
कृती कार्यक्रम 5 मार्च ते 30 जून या कालावधी घेण्यात येणार आहे. कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट केले जाणार आहेत. त्यांच्यासाठी नियमीत अध्ययन कामकाज सुरु ठेवले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल चावडी वाचन व गणन कार्यक्रमातून सादर केला जाईल. त्यावेळी गावातील नागरिक, पालक व यांना आमंत्रित केले जाणार आहे. महाराष्ट्र दिनी (दि.1) ग्रामसभेमध्येही चावडी वाचन व गणन सादरीकरण केले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने शैक्षणिक प्रगती करीत आहे, याचा अहवाल मुख्याध्यापक सादर करणार आहेत. त्यासाठी ग्रामसेवकांची मदत घेतली जाणार आहे. चावडी वाचन कार्यक्रमामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घेण्यात येणार आहे. उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावरर आहे, त्याचा फक्त सांख्यिकी अहवाल सादर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धीक क्षमतेला चालना
अध्ययनात मागे असणार्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढीला चालना देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा राहणार आहे. कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना उभारी तसेच शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी हा पुढाकार शिक्षण विभागाने घेतला आहे. या उपक्रमात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज, शासकीय यंत्रणा या सर्वांचा समन्वयाने पुढाकार राहणार आहे.
दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी तसेच अध्ययनाचे सातत्य राखण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्ग घेण्यात येणार आहे. तसेच, कृती कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्रथम संस्थेमार्फत स्वयंसेवक नेमले जाणार असून प्रत्येक गावात विद्यार्थ्यांच्या घडविण्याचे काम केले जाणार आहे.
सुनील भोपाळे,
उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, राजिप