| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
व्यावसायिक सिलिंडर बंद झाल्याने पनवेल परिसरात व्यावसायिक सिलिंडरच्या विक्रीमध्ये काळाबाजार होत असल्याचे दिसत आहे. तब्बल पाच हजार रुपयांच्या पुढे व्यावसायिक सिलिंडरची विक्री केली जात आहे. तर काही ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे.
युद्धामुळे व्यावसायिक सिलिंडर देणे बंद करण्यात आले आहे, मात्र तरीदेखील या सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री होत आहे. अनेक हॉटेल व्यावसायिक हे सिलिंडर काळ्या बाजारात खरेदी करत आहेत. पनवेल पुरवठा विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वडापाव विक्रेते, भेळ विक्रेते, चहा हॉटेल, हॉटेल चालक, इडली, ढाबे चालक यासह अनेक व्यवसाय पनवेलमध्ये व्यवसाय करत आहेत. त्यातील अनेकांनी 5000 पेक्षा अधिक रुपये खर्च करून व्यावसायिक सिलिंडर घेतले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यवसाय सुरू आहेत. काळ्या बाजारातून सिलिंडर घेतल्याने साहजिकच वस्तूंचेदेखील भाव वाढवले आहेत. प्रत्येक वस्तूचे पाच ते दहा रुपये भाव वाढवण्यात आले आहेत.
तालुक्यातील परिसरातील नागरिकांना गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरकरिता ग्राहकांना चकरा माराव्या लागत आहेत, तर दुसरीकडे तालुक्यातील काही हॉटेल व्यावसायिक तसेच चहा टपरी व्यावसायिक यांच्याकडून घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात दुकानावर अवैध वापर सुरू आहे. विशेषत: महामार्गावर असलेले हॉटेल व्यावसायिक यांच्यावर कारवाई मात्र शून्य दिसून येत आहे.







