| मुंबई | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती मिळावी याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मेघदूत शासकीय निवासस्थान येथे रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. सुनील तटकरे, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांसह रायगडचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाची कामे गतीने करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटनमधील जी प्रलंबित कामे आहेत, त्याची सद्यःस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पर्यटन विभागाने वित्त विभागाकडे जिथे निधीची आवश्यकता आहे त्याची मागणी करावी.
पर्यटन विभागाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीतून कामांची प्राथमिकता लक्षात घेवून निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. व तारांगण निरीक्षण (स्टार गेझिंग)चा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यासाठी कार्यवाही करावी. स्वदेश दर्शन योजना प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई
