साईबाबा मंदिरासह पाणपोईचे उद्घाटन
| अलिबाग | प्रतिनिधी |
पीडित, दलित, गोरगरीबांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासाकडे कायमच लक्ष दिले आहे. अलिबागबरोबरच चेंढरे ग्रामपंचायतीचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच झाला आहे. परेश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सौजन्याने या भागात एक चांगला उपक्रम राबविला आहे. येथील झोपडपट्टीचा अधिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील रोहिदास नगर प्रवेशद्वाराजवळील साईबाबा मंदिर व पाणपोईचा उद्घाटन सोहळा आ. जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.12) मार्च रोजी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, चेंढरेचे माजी उपसरपंच ॲड. परेश देशमुख, माजी उपसरपंच दत्ता ढवळे, राम पाटील, लिना आंबेतकर, लक्ष्मी वाघ, अलका आर्के, नाना घरत, दिनेश कवाडे, जितेंद्र वाघ, महेश पवार, नागेश कुळकर्णी, प्रमोद घासे, शरद कापसे, संतोष पालकर, मिथुन बेलोसकर, महेंद्र आंबेतकर, विद्याधर पालकर, रवींद्र लाड, लक्ष्मण पवार, बाबू अडळुल, नरेश बहिरे, विजय स्वामी, आशा बोराडे, नंदिनी पवार, सिद्धेश म्हात्रे, सिद्धेश देवरुखकर, संजय उत्तेकर, चेतन पाटील, हर्षद गायकवाड, हर्ष पाटील, अक्षय म्हात्रे, करण आर्के, गणेश कुमार आदी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व चेंढरे येथील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले, मोलमजुरी करणारा वर्ग, गोरगरीबांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत, या भावनेतून आपण त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहिदास नगर परिसरातील या झोपडपट्टीमध्ये काहीच विकास नव्हता. येथील नागरिकांच्या विकासासाठी आपण काम केले. वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये शेकापचे योगदान राहिले आहे. वादळामुळे वीजसेवा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करून भूमीगत वीज केबलची सेवा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार राहिला आहे. त्यामुळे वीजसेवा खंडित होण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. चेंढरेचा विकास हा शेकापने केला आहे. संजय पाटील यांचा त्यासाठी पाठपुरावा राहिला आहे. वायशेतमधून चेंढरेपर्यंत स्वतंत्र पाण्याची लाईन आपल्या प्रयत्नातून येणार आहे. येथील गावे, वाड्यांमधील रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे आ. जयंत पाटील सांगितले. ते पुढे म्हणाले, गेली अनेक वर्षे राजकारणात काम केले आहे. मात्र, प्रचंड भ्रष्टाचार, टक्केवारी घेणारे असे सरकार कधीच पाहिले नाही. महाराष्ट्राच्या भूमीला न शोभणारे कृत्य आहे. जनतेमध्ये या सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे.
पुढाकारातून पाणपोई, साईबाबा मंदिर चेंढरे येथील रोहिदास नगरच्या प्रवेशद्वाराजवळच साईबाबा यांचे मंदिर आणि पाणपोई ॲड. परेश देशमुख, जितेंद्र वाघ, महेश पवार यांच्या पुढाकाराने उभारण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या पाणपोईचा फायदा येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना होणार आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बांधण्यात आलेले साईबाबाबांचे मंदिर भक्तांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.