| रायगड | प्रतिनिधी |
चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नगरपालिकेत पाऊल ठेवत आहोत. हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, अशा शब्दांत अलिबागच्या नवनियुक्त नगराध्यक्षा अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना अलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करीत विकासाचा नवा संकल्प सोडला.

अलिबाग नगरपरिषदेच्या महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित समारंभात नगराध्यक्ष अक्षया नाईक आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारला. शुक्रवार, दि. 26 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अलिबाग शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्षया नाईक यांनी आपल्या भाषणादरम्यान एक अत्यंत वैयक्तिक आणि भावूक आठवण शेअर केली. त्या म्हणाल्या, आजपासून 14 वर्षांआधी माझी आई या साडीत इथे आली होती, ही साडी नेसून तिने यापूर्वी पालिकेची सेवा केली होती आणि आज तीच साडी नेसून मी इथे आली आहे. अलिबागच्या जनतेने माझ्या आईवर जेवढे प्रेम केले, तेवढेच प्रेम मलाही मिळेल, अशी मला खात्री आहे. या विधानामुळे उपस्थितांचे डोळे ओलावले आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले.
माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत अक्षया नाईक यांनी स्पष्ट केले की, गेल्या चार वर्षांत जी कामे प्रलंबित राहिली आहेत, ती आता प्राधान्याने पूर्ण केली जातील. शहराच्या प्रगतीसाठी नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि आपुलकी जपण्याचे आश्वासन देत त्या म्हणाल्या, आपण सर्वांनी मिळून सोबत काम करायचे आहे. काम करताना जर माझी कुठे चूक झाली, तर तुमची मुलगी समजून मला हक्काने सांगा. तुमच्या सूचनांनुसारच मी कारभार करेन. अक्षया नाईक यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे अलिबाग शहराच्या विकासाला आता नवी गती मिळणार, अशी आशा व्यक्त होत आहे.














