सिडकोच्या 3322 सदनिकांची सोडत जाहीर
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना जानेवारी-2024 करिता संगणकीय सोडत 19 जुलै रोजी सिडको भवन येथील सिडको सभागृहामध्ये यशस्वीरित्या पार पडली. सिडकोतर्फे 26 जानेवारी रोजी या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी नोड येथे परवडणार्या दरातील 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याप्रसंगी महागृहनिर्माण योजना जानेवारी-2024 मध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांचे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अभिनंदन केले.
सदर संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे पर्यवेक्षक म्हणून मोईझ हुसेन आणि अर्जदारांपैकी तीन अर्जदार हे पंच म्हणून उपस्थित होते. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
सिडकोतर्फे वेगाने विकसित होत असलेल्या तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तळोजा या नोडला सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. द्रोणागिरी हा जेएनपीटी बंदरालगतचा नोड असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होत आहेत. द्रोणागिरी नोडला नेरूळ-उरण रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळपासून द्रोणागिरी नोड हा नजीकच्या अंतरावर आहे. महागृहनिर्माण योजना जानेवारी-2024 च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम लवकरात लवकर परत केली जाईल, असे जाहीर करण्यात आले.