रंगांतून साधणार स्वच्छतेबाबत संवाद

जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

| रायगड। प्रतिनिधी।

रायगड जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग, हिरवा ओला व निळा सुका अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत 5 असे 4 हजार 45 संवादक कुटुंबांना गृहभेटी घेऊन संवाद साधणार आहेत. त्यानुसार कचरा वर्गीकरण व व्यवस्थापनमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.

शाश्‍वत स्वच्छतेसाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाच संवादक घरांना भेटी देऊन ओला, सुका कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापनाबाबत माहिती देतील. यासाठी जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतींमध्ये 4 हजार 45 संवादक कार्यरत राहतील. संवादक म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समिती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गट समन्वयक, जल सुरक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.

अभियानांतर्गत संवादकांनी गावातील सर्व कुटुंबांना भेटी देऊन अभियानाची माहिती द्यायची आहे. गावपातळीवर स्वच्छतेची लोक चळवळ उभी करण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे. दर आठवड्याला राज्य स्तरावरून गृहभेटीचा आढावा घेण्यात येणार आहे.

Exit mobile version