कमर्शियल सिलेंडर टंचाईचा फटका; भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ बल्लाळेश्वर मंदिर येथे देवस्थानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या प्रसादमय अन्नछत्राला कमर्शियल गॅस सिलेंडर टंचाईचा फटका बसला असून, सिलेंडर नियमित उपलब्ध होत नसल्याने आता चक्क पारंपरिक चुलीवर अन्न शिजविण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या माध्यमातून दररोज सुमारे दोनशे भाविकांना जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालीतील अष्टविनायक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरात दररोज राज्यभरातून तसेच परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. देवस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून भाविकांसाठी प्रसादमय अन्नछत्र चालविले जाते. या अन्नछत्रात दररोज शेकडो भाविकांना सवलतीच्या दरात कूपन देऊन जेवण दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. रोज एक सिलेंडरची आवश्यकता असताना आठ दिवसांनी केवळ एकच सिलेंडर उपलब्ध होत असल्याने अन्नछत्र चालविताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
गॅसअभावी अन्नछत्र बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादमय भोजनाची सुविधा सुरू राहावी यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळाने पर्यायी व्यवस्था म्हणून चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक पद्धतीने लाकूडफाटा वापरून स्वयंपाक करण्यात येत असून, त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणे, धूर, वेळ आणि मनुष्यबळ या अडचणी असूनही अन्नछत्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न देवस्थानकडून केला जात आहे.
दरम्यान, पूर्वीप्रमाणे सर्वच भाविकांना अन्नछत्रातून जेवण देणे सध्या शक्य होणार नसल्याचे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मर्यादित साधनसामग्री व इंधन उपलब्धतेमुळे दररोज सुमारे दोनशे भाविकांपुरतीच भोजन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
भाविकांना कमर्शियल सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नछत्र सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भाविकांनी परिस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे असे सांगितले.
जितेंद्र गद्रे
देवस्थानचे अध्यक्ष
