रोहा-कोलाड मार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट

। खांब । वार्ताहर ।

रोहा-कोलाड अंतर्गत राज्य मार्गावर मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या मधोमध ठिय्या बसलेला आढळून येत असल्याने व मोकाट गुरे सैरभैर फिरत असल्याने प्रवासी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहन चालकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मोकाट गुरे ही गावामध्ये एखादे रिकामे घरांचे वरांडे, पडवी दिसताच ही मोकाट कुत्री, गुरे-ढोरे त्याचे गोठ्यात रूपांतर करतात. तरीदेखील गुरांचे मालक निवांतपणे घरीच झोपा काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर या मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही निर्माण होताना दिसत आहे. तर वाहनचालकांच्या घाईगडबडीत अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यातच जर दुर्दैवाने एखाद्या गुराचा अपघात झालाच तर मालकवर्ग भरपाई मिळावी म्हणून धावत पळत येतो. परंतु आपल्या गुरांमुळें अपघातामध्ये एखाद्याला दुखापत झाली तर गुरांचा मालक जवळसुध्दा फिरकत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.

अशा मोकाट ढोरा-गुरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून कडक पावले उचलून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आता दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी वर्ग व वाहनचालक यांच्याकडून केली जाऊ लागली आहे.

Exit mobile version