| पनवेल | प्रतिनिधी |
अज्ञात सायबर चोरट्यांनी कामोठे येथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याला तब्बल 10 लाख 68 हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण नरवडे (37) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रवीण नरवडे हे मुंबईतील एका प्रतिष्ठित कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
नरवडे यांच्या खात्यातून कोणतेही व्यवहार होत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने कामोठे येथील आपल्या बँकेत धाव घेतली. बँक अधिकान्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये तपासणी केली असता, त्यांच्या खात्यातून 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या काळात तब्बल 23 व्यवहार झाल्याने त्यांचे खाते ब्लॉक झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर नरवडे यांनी बँकेकडून त्यांना मिळालेल्या बँक स्टेटमेंटची तपासणी केली असता, सायबर चोरट्यांनी प्रथम नरवडे यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय 5 लाख 11 हजार आणि पुन्हा 5 लाख 4 हजार 479 रुपये असे दोन वेळा इंस्टा जम्बो लोन काढले. त्यानंतर त्याच दिवशी एकूण 10 लाख 15 हजार 479 रुपयांच्या रकमेचे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मध्ये रूपांतरित केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी 1 नोव्हेंबर रोजी ही एफडी तात्काळ मोडून टाकली व पुढील दोन दिवसांत हे सर्व पैसे वेगवेगळ्या गिफ्टच्या नावाखाली 23 वेळा वेगवेगळ्या अनोळखी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. यात नरवडे यांच्या मूळ पगाराची 55 हजार 343 रुपयेदेखील त्यांनी परस्पर काढून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर नरवडे यांनी सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर कामोठे पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्याला साडेदहा लाखांचा गंडा
