। नवीन पनवेल । प्रतिनिधी |
तळोजा आद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मे. केन्स्पेक केमिकल्स प्रा.लि. कंपनीने स्थानिक 104 तरुणांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी केले आहे. त्याबाबत गेली अनेक महिने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. त्याविरोधात 15 एप्रिलपासून कामगारांनी कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांवर अन्याय करू नये, त्यांना बेरोजगार करू नये, असे कंपनी व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले आहे.
तळोजा आद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मे. केन्स्पेक केमिकल्स प्रा.लि. कंपनीमध्ये परिसरातील कामगार गेली 10 ते 20 वर्षे कंपनीच्या विविध विभागांत काम करीत आहेत. डिसेंबर 2023 मध्ये कंपनीला आग लागल्याने उत्पादन प्रक्रिया बंद करण्यात आली होती. कंपनी सुरु झाल्यावर परत आपल्याला कामावर घेतले जाईल या आशेने सर्व कामगार कंपनी सुरु होण्याची वाट बघत होते. मात्र, कंपनी सुरु झाल्यावर काही कामगारांना कंपनीने कामावर घेतले आणि स्थानिक 104 कामगारांना घराचा रस्ता दाखवला. त्याबाबत कामगारांनी विविध विभागाकडे पाठपुरावा करीत न्याय हक्कासाठी लढाई सुरु केली आहे.
कंपनी कंत्राटदाराच्या माध्यमातून बाहेरील कामगार आणून काम करून घेत आहे. मात्र, भूमिपुत्रांना सामावून घेण्यास टाळाटाळ करीत आहे. व्यवस्थापनातील काही मंडळी जाणीवपूर्वक मालक आणि कामगारांमध्ये संघर्ष घडवून आणत आहेत. कंत्राटदाराला हाताशी घेऊन बाहेरील कामगारांकडून काम करून घेत आहे. त्याबाबत कामगारांनी कंपनी गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले असून कंपनीमध्ये परत कामावर घेतले नाही तोपर्यंत आंदोलन सूरु राहील असे कामगारांनी सांगितले आहे.