शेतकर्‍यांना एकरी 50 हजार नुकसान भरपाई द्या

माजी आम.संपतबापू पाटील यांची मागणी
सांगोला | जितेंद्र जोशी |
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण अद्याप पंचनामे झालेले नाहीत.ऊस ,कापूस,सोयाबीन, भात,अशा प्रकारच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून एकरी 50 हजार किंवा पिकाच्या 100 टक्के नुकसानी एवढी भरपाई मिळावी असा ठराव करण्यात आला.या देशातील शेतकरी भांडवलदार होईल तेव्हाच शेतकर्‍यांना सुगीचे दिवस येतील असे मत माजी आमदार संपतबापू पवार यांनी व्यक्त केले.
या बैठकीत सोयाबीन आयातीवर बंदी घालण्यात यावी.तसेच आयात शुल्कात दिलेली सवलत रद्द करावी.ऊसाची एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय हा शेतकर्‍यांवर अन्याय करणारा असल्याने ऊसाची एफआरपी एका टप्प्यात देण्यात यावी.पिक विमा योजनेच्या माध्यमातून खाजगी विमा कंपन्या मालामाल झाल्या.या कंपन्याना 15795 कोटी रुपयांचा नफा झाला.अद्यापही शेतकर्‍यांना देय असलेली 2800 कोटी रुपयांची रक्कम या विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना दिलेली नाही ती तातडीने देण्यात यावी असा देखील ठराव या बैठकीत करण्यात आला आहे.
विजेच्या वाढत्या बिलांमुळे सामान्य नागरिक, लहान मोठे व्यापारी सारेच त्रस्त झाले आहेत. विज बिळात 50 टक्के सवलत देण्यात यावी.सात राज्यात विजेवर आकारण्यात येणारा स्थिर आकार रद्द करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राज्यात वीज बिलावर आकारण्यात येणारा स्थिर आकार रद्द करण्यात यावा असा ठराव संमत करण्यात आला.
पन्नास टक्के आरक्षणाची अट रद्द करण्यात यावी.तसेच केंद्राने इमपीरीकल डाटा उपलब्ध करून द्यावा.लोकसभा आणि विधानसभेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात यावे हा महत्त्वाचा ठराव देखील शेकापच्या सांगोला येथील मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

आबासाहेबांवर पुस्तकाचे प्रकाशन
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीच्या बैठकिच्या दुसर्‍या सत्राला सुरुवात झाली असून यावेळी स्व. गणपतराव देशमुख यांच्या गौरवास्पद कार्याची दखल घेणार्‍या तीन पुस्तकांचे प्रकाशन सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येईल. यापुस्तकांमध्ये भाई जगन्नाथ लिगाडे यांचे माणदेश जनसेवक, कृष्णा इंगोले यांचे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व भाई गणपतराव देशमुख तर प्रा. डॉ. आप्पासाहेब पुजारी यांचे महाराष्ट्रातील यशस्वी सूत गिरणी या पुस्तकांचा समावेश आहे.

Exit mobile version