नुकसानग्रस्तांची अडीच महिन्यांपासून प्रतीक्षा
| रायगड | प्रमोद जाधव |
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची आणि गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली. या नैसर्गिक आपत्तीत शेकडो नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र, नुकसान होऊन अडीच महिने उलटूनही अद्याप एकाही नुकसानग्रस्ताला शासनाकडून भरपाई मिळालेली नाही. एक कोटी 15 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. नुकसान भरपाईची फाईल लाल फितीत अडकून असल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांची संख्या एक हजार 800 हून अधिक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारांहून अधिक आहे. रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. जुलैमध्ये अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना कायमच असतो. वित्तहानी मोठ्या संख्येने होते. यंदा मात्र पाऊस लांबणीवर गेला. ऑक्टोबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडला. या पावसात ग्रामीण भागातील अनेक घरांसह गोठ्यांची हानी झाली. जिल्ह्यातील 181 घरांची या पावसात पडझड झाली. त्यात गुरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले. काहींच्या घरांचे पूर्ण, तर काहींचे अंशतः नुकसान झाले. पक्क्या घरांचीदेखील पडझड झाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. काहींनी प्लास्टिक कापडाच्या आडोशाने कुटुंबाचा संसार सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तलाठी, ग्रामविकास अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याला अहवाल पाठविण्यात आला. 181 घरांसह गोठ्यांच्या झालेल्या पडझडीचे एक कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला. घरे, गोठ्यांच्या झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत लवकर मिळेल, अशी अपेक्षा नुकसानग्रस्तांना होती. परंतु, ही अपेक्षा फेल ठरली. नुकसान होऊन अडीच महिने होत आले आहेत. तरीदेखील शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. नुकसानभरपाईचा प्रस्ताव लाल फितीत अडकून आहे. नुकसानग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. तहसील कार्यालयांसह तलाठी कार्यालयात याबाबत वारंवार विचारणा केली जाते. परंतु, शासनाकडून निधीच आला नसल्याचे माहिती समोर आली आहे. शासनाकडून निधी देण्यास दिरंगाई होत नसल्याने नुकसानग्रस्तांना त्यांच्या घरांसह गोठ्यांची मदत मिळल्यास विलंब होत आहे.
मदतीची प्रतीक्षा
जिल्ह्यात यावर्षी 86 हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार 746 गावांतील 42 हजार 945 शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा फटका बसला. यामध्ये 17 हजार 85 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून निधी मागणी करण्यात आली. शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात तो वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
भरपाईसाठी केवायसीचा विळखा
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, बँक खाते केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता केवायसीचा विळखा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निधी मिळेपर्यंत अजून एक महिना प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे.







