। ठाणे । प्रतिनिधी ।
एका लग्नासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिली होती. यामध्ये फिरोज रशीद खान (33) आणि मेहबूब मलक (50) यांचा मृत्यू झाला होता. यावर ठाण्यामधील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या दोन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपयांहून अधिक नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी वकील पीएम टिल्लू यांनी एमएसीटीला सांगितले की, 18 डिसेंबर 2018 रोजी टेम्पो ट्रॅव्हलरमधील कुटुंबीय एका लग्न समारंभासाठी भुसावळ येथे जात होते. यावेळी एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. या अपघातात फिरोज खान आणि मेहबूब मलक यांचा मृत्यू झाला होता. एमएसीटीच्या निर्णयामध्ये या प्रकरणाला ‘संयुक्त निष्काळजीपणा’ असे म्हणत नोंद करण्यात आली होती. कारण, दोन्ही वाहनांचा विमा एकाच कंपनीने काढला होता. तर, यामधील मृत्युमुखी पडलेले पीडीत हे प्रवासी होते. एमएसीटीने टेम्पोचा मालक नलिनी विलास पाटील आणि ट्रक मालक निशा नरेश अग्रवाल यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार धरले होते. तसेच, या सुनावणीसाठी मालक गैरहजर असल्याने त्यांच्या विरुद्ध पूर्वपक्ष निवाडा करण्यात आला. दरम्यान, यावेळी एमएसीटीने जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, भविष्यातील शक्यता वगळता नुकसान भरपाईच्या रकमेवर 7.5 टक्के व्याजदर लागू करण्यात यावा.