पनवेलसाठी 1 कोटी 48 लाख 29 हजार 918 रुपयांची भरपाई
तहसीलदारांकडून आपद्ग्रस्तांना धनादेशांचे वाटप
| पनवेल | वार्ताहर |
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह पनवेललाही बसला. वादळाच्या तडाख्याने पनवेल तालुक्यातील डोंगराळ भाग, आदिवासी पाडे व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान झाले. तसेच वादळामुळे काही प्रमाणात शेतीचेही नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून 1 कोटी 48 लाख 29 हजार 918 रुपयांचे तहसीलदारांच्या हस्ते धनादेशामार्फत वाटप करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील 1598 पात्र घरांना शासन निर्णयाप्रमाणे 1 कोटी 48 लाख 29 हजार 918 रुपये एवढी देयके मंजूर झाली आहेत. तसेच सदरचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी सदरची रक्कम आपद्ग्रस्तांच्या बँक खात्यात जमा केली आहे. तसेच वादळादरम्यान शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यात 184 शेतक-यांचे एकूण 26.67 हे. आर. क्षेत्रातील आंबा, भाजिपाला, केळी, शेवगा इत्यादी पिकांचे नुकसान झाले असून, प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये याप्रमाणे नुकसानीच्या क्षेत्रानुसार एकूण 12 लाख 68 हजार 300 रुपयांची मदत शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. सदरच्या रक्कम नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांनी तहसीलदार विजय तळेकर यांचे आभार मानले आहेत.