| रेवदंडा | प्रतिनिधी |
कृषी कर्ज मिळणार नाही, असे सांगून अपमानस्पद वागणूक दिल्याबद्दल बँक ऑफ इंडिया, बोर्ली शाखेच्या मॅनेजर विरोधात बारशीवचे शेतकरी संजय महाडिक यांनी मुख्यमंत्री कृषी मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कृषी कर्जाची आवश्यकता असल्याने कायद्याप्रमाणे के.सी.सी/कृषी कर्ज घेण्यास लायक असताना देखील बँक ऑफ इंडिया, बोर्ली शाखेत कर्ज मागणी केली असताना, शाखेच्या मॅनेजर मयुरी घाग यांनी पदाचा गैरवापर करून सदरचे कर्ज मिळणार नाही असे सांगून अपमानस्पद वागणूक दिली.
यापूर्वी के.सी.सी./कृषी कर्ज रक्कम 1 लाख 50 हजार हे 15 ऑक्टो. रोजी परतफेड केली असून आर्थिक अडचणीस्तव पुन्हा के.सी.सी./कृषी कर्ज पुन्हा आवश्यकता होती म्हणून बोर्ली शाखेत गेलो असताना सदर शाखेच्या मॅनेजर मयुरी घाग यांनी सदरचे कर्ज मिळणार नसल्याचे सांगितले. घाग या बँकेच्या मालक असल्या प्रमाणे वागत असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. त्यांच्यावर त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
याबाबत बँक ऑफ इंडिया बोर्ली शाखेच्या मॅनेजर मयुरी घाग यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी कृषी कर्ज देण्यास नाकारले नसल्याचे सांगीतले, तसेच संजय महाडिक यांचागैरसमज झाला आहे असे म्हटले.