जिल्हाधिकरी किशन जावळे यांची माहिती
| रायगड | खास प्रतिनिधी |
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी तपास करुन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
काहीच दिवसांपूर्वी अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करावे, अशी शिफारस नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली होती. त्यामुळे अलिबागकरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या कालावधीत अशी शिफारस करुन भंडारी समाजाला खुश करण्याचा प्रकार असून, तो आचार संहितेचा भंग करणारा आहे. मतांचे धु्रवीकरण करुन जाती-धर्मामध्ये नार्वेकर तेढ निर्माण करत आहेत. याविरोधात अलिबाग येथील अॅड. राकेश पाटील यांनी नार्वेकर यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी विकासकामांचे भूमीपूजन केल्याने आचार संहितेचा भंग झाला आहे. याबाबतचे वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. याप्रकरणी आपण सुमोटो (स्वाधिकार) तक्रार दाखल करणार का, असा प्रश्न जावळे यांना पत्रकारांनी विचारला असता, याबाबत कोणाची तक्रार आल्यास चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात आचार संहिता भंग केल्याच्या आतापर्यंत 25 तक्रारी आल्या होत्या. पैकी 15 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे, तर 10 तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही, असे जावळे यांनी स्पष्ट केले.