घरबसल्या करता येणार तक्रारीची नोंद

| खोपोली | प्रतिनिधी |

भीतीमुक्त तक्रारीसाठी रायगड पोलिसांकडून आधुनिकतेची मदत घेण्यात आल्याने आता पीडितांना भयमुक्त तक्रारीसाठी ‌‘न्याय सारथी‌’चा आधार मिळणार आहे. त्यामुळे ही प्रणाली पोलीस व नागरिक यांच्यामधील एक दुवा बनली आहे. क्यूआरकोडचा वापर करून ही प्रणाली सुरू करण्यात येत असून घरबसल्या तक्रारीची नोंद करता येणार आहे, असे मत खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड पोलीस आणि सिमप्लरटुडे एआय यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय सारथी ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी लहान मोठे वाद विवाद होत असताना काहीजण अन्यायाने त्रस्त आणि भीती पोटी पोलीस ठाण्यामध्ये जात तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. तसेच, काहींना तक्रार कशा पद्धतीने द्यायची याची माहिती नसते. त्याचा परिणाम गुन्हेगार अधिक बळावून भविष्यात गंभीर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी रायगड पोलिसांनी या प्रणालीच्या माध्यमातून क्यूआरकोडची निर्मिती करत आधुनिक युगातील टेक्नॉलॉजी मदत घेतली आहे. त्यामुळे अन्यायग्रस्तांची भीती दूर करण्यासाठी ‌‘न्याय सारथी‌’ प्रणाली सुरु करत नागरिकांची तक्रार कायदेशीर पद्धतीने व वेळेत पोलिसांकडे पोहोचविणे शक्य होणार आहे. त्यामुळे गुन्हेगाराला वेळीच चाप बसण्यास मदत होणार असल्याने रायगड पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version