एमएमआरडीअंतर्गत रस्ते प्रकल्प पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.28 जुलै) दिले.

मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांचेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य गोदामे, लॉजिस्टिक्स केंद्रे, कंटेनर-ट्रक टर्मिनल्समुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि अनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नियमबाह्य गतिरोधक काढून टाका
बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक करण्यात आले आहेत. जे नियमबाह्य आहेत तातडीने काढण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. बांधकाम विभागाने राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना गतिरोधकांसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version