चेंढरे, शहापूरमध्ये निकटवर्तीयांचा बळी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राजकारणात सत्तेसाठी तडजोडी होत असतात; पण त्या तडजोडी जर थेठ निष्ठावंत कार्यकर्ते, आपलेच कुटुंबीय आणि विश्वासू सहकाऱ्यांच्या बळीवर होत असतील, तर तो केवळ राजकारणाचा खेळ न राहता, तो निर्लज्ज सत्तालालसेचा नमुना ठरतो. भाजप-शिंदे गटातील सध्याची स्थिती नेमकी अशीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उघडपणे सुरू आहे. आपल्या कुटुंबातील उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी निष्ठावंतांचा बळी देत उघड सौदेबाजी केल्याचे आरोप आता दबक्या आवाजात न राहता जाहीरपणे चर्चेत आले आहेत. स्थानिक आमदाराने आपल्या सुनेला जिल्हा परिषदेत निवडून आणण्यासाठी भाजपच्या तगड्या उमेदवारासोबत थेट सत्तासमझोता केल्याची चर्चा आहे. भाजपच्या प्रियदर्शनी पाटील यांच्यासमोर टिकाव लागणार नाही, या भीतीने आमदारांनी सौदेबाजी केल्याने प्रियदर्शनी पाटील यांनी माघार घेत जिल्हा परिषदेवरुन थेट पंचायत समितीवर उडी मारली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तावाटपाचे आमिष दाखवत, मदतीच्या नावाखाली राजकीय देवाणघेवाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या सौद्यामध्ये सर्वाधिक फटका मोठ्या अपेक्षेने शिंदे गटात प्रवेश केलेल्या चेंढरेतील मृणाल पाटील कुटुंबियांना बसला आहे.
संघर्ष आणि स्थानिक पातळीवरील ताकद असूनही, केवळ कौटुंबिक हितासाठी त्यांना बाजूला सारण्यात आल्याची खदखद कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. “घरातली उमेदवारी सुरक्षित, बाहेरचे कार्यकर्ते संपवायचे” हेच सूत्र या राजकारणामागे असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे, भाजपमधील काही नेत्यांची स्थितीही तितकीच धक्कादायक आहे. स्वतःच्या निवडणुकीबाबत शाश्वती नसल्याने त्यांनी थेट आपल्या भावाचाच राजकीय बळी दिल्याची चर्चा आहे. केवळ स्वतःचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत सहकार्याचे आश्वासन देण्यात आले, अशी दबक्या आवाजातील कबुली कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे. सार्वजनिकपणे एक भूमिका आणि आतून दुसरी, असा दुटप्पी चेहरा आता उघड होत आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे भाजप-शिंदे गटातील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे महत्त्व या घोषणांचा बुरखा गळून पडला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जर स्वतःच्या कुटुंबातील लोक, जुने सहकारी आणि निष्ठावंत कार्यकर्तेही वापरून फेकले जात असतील, तर अशा नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित
होत आहे.
सत्तेच्या गणितात विचारधारा, नातेसंबंध आणि प्रामाणिक मेहनत सगळेच दुय्यम ठरत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. आज बळी गेले ते कुटुंबीय आणि काही निष्ठावंत कार्यकर्ते असले, तरी उद्या हा फास कुणाच्या गळ्यात बसेल, हे सांगता येत नाही. भाजप-शिंदे गटातील ही छुपी युती आणि उघडी सौदेबाजी येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा रोष पेटवेल, की नेते पुन्हा एकदा सत्तेच्या जोरावर सगळे दाबून टाकतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या सत्तासौद्यामध्ये मोठ्या अपेक्षेने शिंदे गटात प्रवेश केलेल्या चेंढरेतील पाटील कुटुंबीयांचा आमदारांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी बळी दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दुसरीकडे, भाजपच्या काही नेत्यांना स्वतःच्या निवडून येण्याबाबत शाश्वती नसल्याने त्यांनी थेट आपल्या भावालाच राजकीय बळी देत राष्ट्रवादीशी अंतर्गत सहकार्याचे गुप्त आश्वासन दिले असल्याचीही चर्चा आहे. सत्तेच्या गणितात नातेसंबंध, निष्ठा आणि कार्यकर्त्यांचे योगदान दुय्यम ठरल्याचे हे ठळक उदाहरण ठरत असून, दोन्ही गटांचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडला आहे.
