कोंढाणेसाठी सक्तीचे भूसंपादन; शेतकऱ्यांचा विरोध

केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी दिल्या जमिनी

| नेरळ | संतोष पेरणे |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना प्रकल्प उभारणीचा फटका कर्जत तालुक्यातील कोंढाणेतील शेतकऱ्यांना बसणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अपेक्षित पाण्याची गरज भागविण्याकरिता सिडको महामंडळ धरण बांधणार आहे. या धरणासाठी जमिनी द्याव्या म्हणून सरकारने मे 2023 मध्ये शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. धरणासाठी आवश्यक असणाऱ्या संपादित जागेपैकी केवळ दहा टक्के भूसंपादन करण्यात महसूल विभाग यशस्वी ठरला होता. त्यामुळे आता सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी शासनाने अधिसूचनेद्वारे नोटिसा दिल्या आहेत. दरम्यान,कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्यात राखीव ठेवण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी आहे. आता शासनाने सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर कोंढाणे पाणीपुरवठा प्रकल्प सिडको महामंडळामार्फत उभारण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात बाधित झालेल्या 270 गावांच्या जमिनीवर नैना प्रकल्प साकारला जात आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या धरणातून केली जाणार आहे. कर्जत तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा नवी मुंबई महानगरपालिका किंवा सिडको महामंडळ यांना धरणातील पाणी देण्यास विरोध आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी व्हावे अशी मागणी असून त्यासाठी अनेक आंदोलने उभी राहिली आहेत. या प्रकल्पात चोची येथील 26 हेक्टर आणि कोंढाणेतील 20 हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणार आहे.

Exit mobile version