रायगडात शालेय प्रवेशाची सक्ती


जि.प. सीईओंचे निर्देश; विद्यार्थ्यांविनाच शैक्षणिक सत्राला प्रारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
(Raigad) रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण घेणार्‍या ज्या बालकांना सहा वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा बालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीमध्ये प्रवेश द्यावा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात 2 हजार 661 अंगणवाड्या असून, कोरोना संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळा बंद आहेत. अंगणवाडी म्हणजे मुलांच्या शिक्षणाची पहिली पायरी. या पायरीवर मुलांना खेळ, गप्पा-गोष्टी, अंक-आकड्यांची तोंडओळख होते. सहा वर्षे पूर्ण झाल्यावर या मुलांना पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो.

सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. त्यातच कोरोनाची येणारी तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची आहे, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे शाळा केंव्हा सुरू होतील याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरुन पुढील कालावधीत कोरोनाची प्रादुर्भाव परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामध्ये सहा वर्षे पूर्ण झालेल्या अंगणवाडीतील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या बालकांची पूर्ण यादी तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीनुसार तयार झालेली यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना द्यावी व त्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

बालविकास प्रकल्प अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर योग्य नियोजन करून वयाची सहा वर्षे पूर्ण झालेल्या बालकांना पहिलीमध्ये प्रवेश द्यावा. तसेच त्याबाबत आवश्यक ती जनजागृतीही करावी आणि या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल 30 जूनपर्यंत जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाकडे पाठवावा. एकही बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

नितीन मंडलिक,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद

Exit mobile version