। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद वाकस केंद्राच्या वतीने कोलीवली शाळेमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी शाळेत नव्याने निर्माण केलेल्या संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
कोलीवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी कार्यक्रमाचे उद्घाटन वाकस ग्रुपग्रामपंचायत सरपंच सुदर्शना संजय तांबोळी यांच्या हस्ते झाले. गावात लेझीम ढोल ताशे यांच्या गजरात दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये सर्वजण उत्साहात सहभागी झाले.तदनंतर संगणक कक्षाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी अनंता डांगरे यांच्या हस्ते झाले. नवीन दाखलपात्र विद्यार्थी यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापक एन डी म्हात्रे यांनी देखील दोन बाळ गीते सादर केली. शाळेतील दाखलपात्र बालकांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि प्रश्न विचारून त्यांच्या सुप्तगुणांना वाव दिला. या शाळा पूर्व तयारी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली. यावेळी पालकांसह वाकस शाळेच्या शिक्षिका पाटील, नेवाळी शाळेचे शिक्षक जोगदंड आदी उपस्थित होते.