। अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अलिबाग येथे दोन संगणक मंगळवारी (दि. 29) पुरविण्यात आले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने वाढीव दैनंदिन कामकाजाची पूर्तता करण्याच्यादृष्टीने अलिबाग पोलीस ठाण्याला संगणकांची तातडीने आवश्यकता होती. संगणक आरसीएफ कडून उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी अलिबाग पोलीस ठाण्याने केली होती. 26 ऑक्टोबरला प्राप्त झालेल्या पत्रानुसार सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगणकांची निकड लक्षात घेऊन आरसीएफ व्यवस्थापनाने कार्यालयीन वापरातले दोन संगणक अलिबाग पोलीस ठाण्यासाठी त्वरित उपलब्ध करून दिले. आरसीएफ थळच्या आयटी कर्मचार्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अलिबाग येथे जाऊन दोन संगणक स्थापित करून पोलीस कार्यालयाचे कामकाज सुरू करून दिले. संगणक त्वरित उपलब्ध करून दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी समाधान व्यक्त करून आरसीएफ व्यवस्थापनाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.