कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन

। नाशिक । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिष्ट पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. गोडसे यांनी मंगळवारी सायंकाळी संसरी येथे अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुले अजय आणि संजय, मुलगी मीरा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांनी शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी विविध आंदोलन केले. तुरुंगवास भोगला. गोवा मुक्तिसंग्रामातही ते सक्रिय सहभागी राहिले. इगतपुरीचे पहिले आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसे, कॉम्रेड एस. ए. डांगे, कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्योसोबत गोडसे यांनी काम केले होते. प्रा. एन. डी. पाटील यांच्यानंतर लगेचच गोडसे यांचे निधन हे परिवर्तनवादी डाव्या चळवळीला बसलेला मोठा धक्का असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जेष्ट स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version