पनवेलच्या पर्यावरण अहवालात वाढती लोकसंख्या अनियोजित जमीन वापराबाबत चिंता

पर्यावरण अहवालाची प्रत सर्वसामान्यांसाठी खुली
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या पर्यावरण अहवालाची प्रत सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. यात औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली असून वाढती लोकसंख्या ही मुख्य समस्या असून जमीनींचा वापर अनियोजित असल्याचे म्हटले आहे. पाणीपुरवठा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन हे मुख्य प्रश्‍न सोडविणे गरजेचे असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. पनवेल महापालिकेने करोनामुळे गेल्या दोन वर्षांचा पर्यावरण अहवाल बनविला नव्हता. मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत हा अहवाल सदस्यांसमोर मांडण्यात आला. मात्र अहवालातील ठळक मुद्दे मांडण्यात आले होते, मात्र त्याची प्रत देण्यात आली नव्हती. ही प्रत आता मिळाली असून विकासाच्या वाटेवर असलेल्या पनवेल शहराच्या अनेक समस्यांवर बोट ठेवण्यात आले आहे. पनवेल पालिकेने कोणत्या सुधारणा कराव्यात याविषयी या अहवालात सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या, राहणीमान, घरांची व्यावसायिक रचना, शहरीकरण, औद्योगिकीकरणासह आरोग्य आणि शिक्षणाचे स्तर यासारख्या सामाजिक घटकांचा अहवालात समावेश आहे. प्रभागांमधील लोकसंख्येत असणार्‍या तफावतीचा तपशीलही नमूद करण्यात आला आहे.अधिक लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे परवडणारी घरे, सुसह्य प्रवासासाठी रेल्वे मार्गिका आणि मोठे औद्योगिक प्रकल्प आदी पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. ‘लँडस्केप’ हे पनवेल शहराचे महत्त्वाचे वैशिष्टय असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. घरांच्या वाढत्या मागणीमुळे जमिनीचे दर वाढले आहेत तसेच प्रभाग क्रमांक 1 ते 3 आणि 20 मधील जमिनीचा वापर अनियोजित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. भविष्यातील जमिनीच्या वापराबद्दल पालिका प्रशासनाने नियोजनावर अधिक भर देणे गरजेचे आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन करीत नागरिकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक अस्थितरता दूर होईल आणि झोपडपट्टीवासीयांचे राहणीमान उंचावेल असा सल्लाही देण्यात आला आहे. याबरोबरच शहरातील अरुंद रस्ते, अनियमित पाणीपुरवठा या समस्या असून शहरात वृक्ष लागवडीची गरज आधोरेखित करण्यात आली आहे. तसेच मलनि:सारण वाहिनीसाठी जागा उपलब्ध नसल्याचेही म्हटले आहे.

औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण अधिक
पावसाळ्यातील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पिण्याच्या पाण्याचा दर्जा चांगला नसतो. त्यात या काळात वायू प्रदूषणही असते. औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. कासाडी आणि तळोजा नदीचे जलस्रोत अत्यंत प्रदूषित झाले आहेत. घातक रासायनिक कचरा थेट पाणी प्रवाहात सोडल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. पालिका क्षेत्रात वायू प्रदूषणाची पातळी मध्यम आहे. मात्र 2018-19 मधील अहवालात सुचविलेली हवा तपासणी यंत्रणा तात्काळ बसविण्यात यावी असे नमूद केले आहे. पनवेलमधील प्राणवायूची पातळी वाढण्यासाठी पनवेल पालिकेने केलेल्या कामाची प्रशंसा करण्यात आली असून वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version