मैफिल अलिबागतर्फे दोन दिवसीय संगीत महोत्सव; 14 व 15 मे रोजी पार पडणार कार्यक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।
मैफिल अलिबागतर्फे 14 व 15 मे रोजी दोन दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. 14 तारखेला अंजली व नंदिनी गायकवाड (इंडियन आयडॉल फेम) या ङ्गस्मरण लताफ या कार्यक्रमातून स्व. लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहणार आहेत. तर, दुसर्‍या दिवशी पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन व ऋतुजा लाड यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. पं. सतीश व्यास हे पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आहेत.
तसं पाहिलं तर या वर्षाची सुरुवातच सांस्कृतिक, सांगितिक, कला क्षेत्राला धक्के देणारी झाली. फेब्रुवारी मधे लतादीदी तर दोनच महिन्यांत, म्हणजे मे महिन्यात पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं. रत्नजडित हारातील एकेक सुंदर मोती निखळून पडल्यावर हतबलतेची जी जाणीव होते, तीच भावना सध्या रसिकांच्या मनात आहे.
या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या कलांच्या आठवणींमध्ये रंगून जाण्याचं भाग्य मैफिलमुळे रसिकांच्या दारी आलं आहे. एकीने सात सुरांच्या साथीने कवींच्या शब्दांना न्याय देत एकापेक्षा एक सुरस गाण्यांनी हिमालयाएवढी उंची गाठली, तर हिमालयाच्या कुशीतून आलेल्या पंडितजींनी संतूरसारख्या तंतूवाद्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मानाचं स्थान मिळवून दिलं. लताजीनी सुरांच्या क्षेत्रात तर पंडितजींनी संतूरच्या माध्यमातून जनमानसात स्वतः ची मोहोर उठवली आणि दोघांनीही आपापल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. लताजींच्या आवाजातील पहाडी इलाख्यातील गाणी असोत, हिमाचल प्रदेशातील खळखळणार्‍या नद्यांचे दृश्य असो, दोन प्रेमीयुगुलांच्या प्रेमाची कबुली असो किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग असो, संतूरच्या पार्श्‍वसंगीताशिवाय त्याला पूर्णत्व नाही.

पंडितजींमुळे मानाचं स्थान
संतूर हे काश्मीरच्या खोर्‍यात लोकसंगीतात वाजवले जाणारं एक तंतूवाद्य! संस्कृत वाङ्मयात त्याला शततंत्री वीणा म्हटलंय. वीणा, सारंगी, सरोद, सतार, या सगळ्या प्रस्थापित तंतूवाद्यांमध्ये संतूरचा क्रमांक शेवट लागतो. तंतूवाद्यांच्या निर्मितीसाठी विज्ञान लागतं, पण त्यातील कला सादर करण्यासाठी सर्जनशील हातच लागतात. विशेष ओळख नसलेल्या संतूरला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात मानाचं स्थान केवळ पंडितजींमुळे मिळालं. आता संतूरशिवाय गाणं ही कल्पना ही कोणाला रुचत नाही. व्ही शांताराम यांच्या ङ्गझनक झनक पायल बाजेफ या हिंदी चित्रपटा पासून संतूरला हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळालं ते कायमचेच.

रसिकांच्या मनावर अधिराज्य
लताजींच्या अलौकिक सूरांत गीतकार, संगीतकार, गायक, कलाकारांच्या अनेक पिढ्या न्हाऊन निघाल्या. पाच दशकांहून जास्त काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. अनेक भाषांमध्ये त्यांच्या सुरांनी मुशाफिरी केली. लताजींचं कोणतही एक गाणं आवडतं असं म्हणणं म्हणजे दुसर्‍या गाण्यावर अन्याय करण्यासारखं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं गाणं हे आपल्याला आपलं वाटतं हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. या बाबतीत सी. रामचंद्र एकदा म्हणाले होते की, संगीतकाराला काय हवय ते समजून त्याला हवे ते देण्याची ताकद लताच्याच गळ्यात आहे. शब्द-सूर-ताल यापेक्षा संगीत आणखी काही मागते. त्याला संगीताच्या शास्त्रात नाव नाही. भारतात अशी एकच गायिका आहे की तिला रचनेबरोबरच संगीताची ही मुकी मागणी ही कळते

Exit mobile version