वाशी येथील ज्ञानेश्‍वरी पारायणाची सांगता

ज्ञानराज बाल मृदुंगवादकाची चर्चा

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील वाशी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात नुकतेच काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली. या कीर्तनामध्ये चौथीत शिकत असणार्‍या ज्ञानराज निवृत्ती पाटील या छोट्या मृदुंगवादकाने वाशी पंचक्रोशितील सर्व भाविकभक्तांची वाहवा मिळविली. ज्ञानराजचे वडील कीर्तनकार व मृदुंगवादक, आई हरीपाठ मंडळाची संयोजक, बहीण सातवीत शिकत असून, ती कीर्तनकार आहे.

सप्ताहात दररोज सकाळी 5 वाजता काकडा, सायंकाळी 4 वाजता प्रवचन, संध्याकाळी 7 वाजता हरीपाठ व ज्ञानेश्‍वरी ग्रंथाचे वाचन झाले. धीरज महाराज डोलवी, दिनेश महाराज डोलवी, ज्ञानेश्‍वर महाराज वडखळ, सुमनताई वाशी या सर्वांचे प्रवचन झाले. सप्ताहात एकनाथ महाराज पाटील नवी मुंबई पुरुषोत्तम महाराज धाटावकर रोहा या दोघांनी कोणतेही मानधन न घेता कीर्तन केले. त्यानंतर मारुती महाराज कोल्हटकर रोहा रामदास महाराज खानावकर खालापूर यांचे कीर्तन झाले. टी.व्ही. स्टार दत्तात्रेय बुवा ओढांगी यांचे संगीत भजन झाले.

वाशी, ओढांगी गावात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. सकाळी 11 वाजता महेश साळुंखे महाराज पाटणोली पनवेल यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनास बाल मृदुंगवादक असलेला ज्ञानराज निवृत्ती पाटील यांनी सुंदर अशी मृदुंग साथ केली. वाशी गावात हा ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आनंदी वातावरणात पार पडून भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

Exit mobile version