समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’

प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने लोखंडी बॅरिकेड्स
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्याची पाहणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणानंतर नागरिक आणि पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या विस्तृत सिमेंट काँक्रिटच्या प्लॅटफॉर्मवर दुचाकींची वर्दळ सुरू झाल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी तातडीने पुढाकार घेत या मार्गावर लोखंडी बॅरिकेड्स बसवून घेतले आहेत. त्यामुळे काँक्रिट प्लॅटफॉर्म आता पादचाऱ्यांसाठी सुरक्षित झाला असून, दुचाकीस्वारांना प्रवेश करता येणार नाही.

अलिबाग समुद्रकिनारा हा शहराची ओळख असण्याबरोबरच नागरिक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सुशोभीकरणामुळे समुद्रकिनाऱ्याला अधिक देखणे स्वरूप प्राप्त झाले असून, नागरिकांना निवांत फेरफटका मारता यावा, कुटुंबासह वेळ घालवता यावा आणि पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

मात्र, या नव्याने विकसित करण्यात आलेल्या काँक्रीट प्लॅटफॉर्मवर काही दुचाकीस्वार वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. तसेच सुशोभीकरण केलेल्या परिसराच्या देखभालीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती.

ही बाब लक्षात येताच प्रशांत नाईक यांनी संबंधित यंत्रणेला सूचना देऊन प्लॅटफॉर्मच्या प्रवेशाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स बसवून घेतले. या उपाययोजनेमुळे दुचाकींची ये-जा रोखली जाणार असून, नागरिकांना आता मोकळेपणाने आणि सुरक्षितपणे चालता-फिरता येणार आहे.

‌‘सुविधा निर्माण करण्याबरोबरच त्यांचा योग्य वापर आणि नागरिकांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे,‌’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या या तातडीच्या उपाययोजनेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. दैनंदिन वापराशी संबंधित छोट्या-छोट्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तातडीने उपाय करण्याची कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अलिबागमध्ये स्थानिक नागरिकांसह गणेशभक्त आणि पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पादचारी सुविधा, समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांची सुरक्षितता आणि सुशोभीकरण केलेल्या परिसराची देखभाल याबाबत त्यांनी संबंधित प्रशासनाकडून माहिती घेतली.

गर्दीच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. गणेशोत्सवात अलिबागमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत असलेले शहर अनुभवता यावे, यासाठी सुविधा आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

समुद्रकिनाऱ्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्सची तातडीने केलेली उपाययोजना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी, या दोन्ही उपक्रमांतून ‌‘नागरिक सुविधा प्रथम‌’ हा दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.

यावेळी सभापती अनिल चोपडा, नगरसेविका अश्विनी ठोसर, नगरसेवक जमाल सय्यद यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्याची पाहणी
दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटकांच्या वर्दळीच्या परिसरातील सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी अलिबाग समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुविधा तसेच समुद्रकिनारी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली.
Exit mobile version