। पनवेल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रभाग क्रमांक 18मधील वाल्मिकी नगर येथील सर्व गल्ली काँक्रिट करण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाचे उद्घाटन नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, झिंझोटकर माऊली व लता म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. वाल्मिकीनगर हे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आहे. परंतु चालण्याकरिता व्यवस्थित रस्तेदेखील नसणे, पाऊस पडल्यावर घरात पाणी साचणे अशा अनेक तक्रारी नगरसेविका डॉ.सुरेखा महोकर यांच्याकडे वारंवार येत होत्या.
नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य जाणून नगरसेविका डॉ. मोहोकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून वाल्मिकीनगर येथील गल्ली काँक्रीटीकरण करण्याचे काम मार्गी लावून घेतले. सर्व रहिवासी नागरिकांनी डॉ. मोहोकर यांचे आभार मानून आपापले गल्लीतील इतर सोयीसुविधा विषयीच्या सूचना केल्या व समाधान व्यक्त केले.