काँक्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा

50 किलोमीटर अंतर झाले कमी

| चिरनेर | प्रतिनिधी |

सिडकोच्या सागरी महामार्गावरील खोपटे चौकात खड्डेमुक्तीसाठी सिडकोने पाऊल उचललेले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्याने प्रवास सुखकर होत असून वाहतूक कोंडी दूर झाली आहे. चार महिन्यात हे काम पूर्ण झाले. या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वाळविण्यात आली होती. मात्र, आता काम पूर्ण झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

खोपटे जंक्शनवरून जेएनपीटी, द्रोणागिरी, मुंबई, पळस्पे तसेच चिरनेर, खोपटे, पेण, अलिबाग येथे जाणारी वाहने देखील ये-जा करत आहेत. अवजड वाहनांमुळे खोपटे चौकात अपघाताची संख्या वाढली होती. कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक सातत्याने करत होते. अखेर सिडकोने याची दखल घेत येथे रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. दरवर्षी याच मार्गाने गणेश उत्सवासाठी कोकणात जाणारे गणेशभक्त मुंबई-गोवा मार्गाला जोडणाऱ्या सिडकोच्या सागरी महामार्गावरून प्रवास करतात. येथे प्रचंड खड्डे असल्याने या मार्गावरून गणेश भक्तांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. मात्र या मार्गावर काँक्रिटीकरण झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई आणि नवी मुंबईतील चालक उरणला जोडणाऱ्या नवी मुंबईतील आम्रमार्ग आणि अटल सेतू मार्गाने खोपटे पूल खारपाडामार्गे प्रवास करीत आहेत. त्यामुळे वाहनांना 50 किलोमीटरचे अंतर कमी होत आहे. या मार्गाने नवी मुंबईतून गव्हाण फाटा उड्डाणपूलमार्गे तर अटल सेतूवरून चिरलेमार्गे सिडको सागरी महामार्ग असा प्रवास करता येतो. त्यामुळे पनवेल पळस्पे कर्नाळा या मार्गाऐवजी थेट खारपाडा येथे पोहोचता येते.

या मार्गावरू जेएनपीए बंदरावर आधारित असलेल्या गोदामातून हजारो जड कंटेनर वाहनांची ये-जा होत आहे. या जड वाहनांमुळे या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. या चौकात वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा नसल्याने हा धोका वाढला होता. यामुळे वारंवार खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी प्रवाशांकडून केली गेली होती.

Exit mobile version