| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यावरील 10 किलोमीटर लांबीचा रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 112 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केला आहे. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, पण कामाची गती पाहता रस्त्याचे काम निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरु केले आहे काय? असा प्रश्न वाहनचालक यांच्यासमोर पडला आहे.
या राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ रेल्वे फाटक ते निर्माण नगरी आणि पुढे धामोते गावापासून कळंब पोही फाटा असा रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला 112 कोटींचा निधी हायब्रीड तत्वावर मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाला 2025 मध्ये मंजुरी मिळाली असताना देखील कामाला सुरुवात 2026 मध्ये झाली. या रस्त्याच्या सध्या साधारण तीन किलोमीटर लांबीचा रस्ता काँक्रीटचा तयार आहे. त्या पुढील रस्ता बनविण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरील ठेकेदार आणला गेला आहे. त्यामुळे ठेकेदाराचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्याचे काम मंजूर आहे काय? असा प्रश्न पडला आहे. या रस्त्याने वाहतूक करणारे वाहनचालकांना गेल्या दिड वर्षांपासून खाडी आणि धुळीचे कणांचा सामना करावा लागत आहे. त्यात रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी टाकण्यात आलेली मातीमुळे दुचाकी चालकांना श्वसनाचे आजार जडले आहेत.
धामोते गावाच्या हद्दीतून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून मागील तीन दिवसांपासून जुना रस्ता खोदकाम केला जात आहे. मात्र, तरीदेखील 50 मीटर लांबीचा रस्ता देखील खोदून झालेला नाही. दरम्यान, आगामी काही दिवसांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असल्याने रस्त्यावरील धुळीने लोट यामुळे कंटाळलेल्या वाहन चालक यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आणि निवडणूक जुमला म्हणून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे काय? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
वाहनचालकांकडून रस्त्यावर किमान साधे डांबरीकरण करून खड्डे बुजवण्यात यावेत अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र गेली दोन महिने सार्वजनिक बांधकाम विभाग वाहनचालक यांचे हाल पाहत होते. परंतु आता काही दिवसांनी निवडणूक आल्याने सत्ताधारी पक्षाला या खड्डेमय रस्त्याचा मोठा फटका बसू शकतो. हे लक्षात घेऊन नेत्यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चार दिवसात केवळ 50 मीटर रस्ता देखील खोदून झालेला नाही आणि त्यामुळे रस्त्याचे काम करणे हा निवडणूक जुमला वाटू लागला आहे.
या रस्त्याच्या काँक्रीटीकरणापेक्षा रस्त्यावरील खड्डे चांगल्या पद्धतीने भरण्याची अपेक्षा होती. मात्र, अनेक महिने धूळ खात आम्ही प्रवास करतोय. परंतु, आता निवडणुका जवळ आल्या म्हणून काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली आहे, हे पाहता हा निवडणूक जुमला असून कामाची गती पाहता निवडणूक झाल्यावर पुन्हा काम बंद होण्याची भीती वाटते.
-संजय विरले,
वाहनचालक







