अलिबाग -वडखळ रस्त्याचे काँक्रिटीकरण करा; पंडित पाटील यांची मागणी


अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग ते वडखळ या मार्गाचे जेएसडब्लू अथवा नॅशनल हायवेच्या माध्यमातून काँक्रिटीकरण होणे आवश्यक आहे,अशी मागणी शेकाप नेते,माजी आम.पंडित पाटील यांनी केली आहे.
अलिबाग हे जिल्हा मुख्यालय आहे.शिवाय पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबागला भेट देत असतात.मात्र सद्यस्थितीतील रस्ता हा खराब आणि अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.जेएसडब्ल्यूची अवजड वाहतूक याच मार्गावर सातत्याने होत असते.त्यामुळे या रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे.या रस्त्याचे चौपदकरण करावे,अशी मागणी शेकापने सातत्याने केलेली आहे.शिवाय सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनीही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केलेला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेवरुन आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच दिलेला होता.पण प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार आम्ही आंदोलन स्थगित केले होते.पण आता मात्र पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे.यासाठी या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे.असे पंडित पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त आणि सिमेंट काँक्रिटचे करण्याचा मानस व्यक्त केला आहे.केवळ मुंबईचेच रस्ते नकोत तर कोकणातील सर्व रस्तेही काँक्रिटचे बनवा,अशी आमची मागणी आहे.कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हे काँक्रिटीकरण झाले तर रस्ते टिकतील.
पंडित पाटील, माजी आमदार

Exit mobile version