दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध

पनवेल काँग्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन

| पनवेल | प्रतिनिधी।

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा प्रकरणी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पनवेल शहर काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी नगरसेवक हरीश केणी नगरसेवक लतीफ शेख काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा निषेध करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Exit mobile version